शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची माहिती आणि या शूर वीरांच्या जीवनगाथा विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने 2021 मध्ये शौर्य पुरस्कार पोर्टल (GAP) अंतर्गत प्रकल्प वीर गाथा सुरू करण्यात आला, जेणेकरून देशभक्तीची भावना जागृत होईल आणि त्यांच्यात नागरी जाणिवेची मूल्ये रुजतील.
वीर गाथा प्रकल्पाने शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित सर्जनशील प्रकल्प/उपक्रम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन हे उदात्त उद्दिष्ट अधिक दृढ केले.
वीर गाथा आवृत्ती-1 च्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यशानंतर संरक्षण मंत्रालयाने आता शिक्षण मंत्रालयाच्या समन्वयाने वीर गाथा 2.0 प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सांगता जानेवारी 2023 मध्ये पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे. मागील आवृत्तीनुसार, हा प्रकल्प सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांसाठी खुला असेल.